औरंगाबादेतील उड्डाणपुलावर लिहिले '#माफीवीर सावरकर', भाजपकडून कडक कारवाईची मागणी

Foto

औरंगाबाद- दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला सिडको बसस्टँड येथील वसंतराव नाईक चौकातील उड्डाणपूल सुरुवातीपासून वादग्रस्त ठरत आलेला आहे. गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तीने या पुलाच्या रस्त्यावर मध्यभागी ‘#माफीवीर सावरकर असे लिहिल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

 

पुलाच्या नावावरुन सुरुवातीपासून वाद

वसंतराव नाईक चौकातील या पुलाजवळ वसंतराव नाईक यांचा पुतळा आणि शेजारीच वसंतराव नाईक महाविद्यालय असल्यामुळे या पुलाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची मागणी समोर आली होती. त्याशिवाय हा मार्ग जालना आणि पुढे राजमाता जिजाऊ यांचे माहेर असलेल्या सिंदखेडराजाकडे जातो, यामुळे या पुलाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी मराठा संघटनांनी केली होती. त्यासाठी त्यांनी आक्रमक आंदोलनही केले होते. परंतू या मागण्यांकडे दुर्लक्ष करून पुलाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आले होते.

 

गुरुवारी रात्री उशिरा अज्ञाताने येऊन या पुलावर मध्यभागी माफीवीर सावरकर असे स्प्रे पेंटने लिहून एकप्रकारे नवीन वादाला जन्म दिला आहे. याआधी शहरातील समर्थनगर भागात असलेल्या सावरकरांच्या पुतळ्याची विटंबनाही करण्यात आली होती. शहरातील रहदारीच्या रस्त्यावर हे काम कोणी केले असेल या बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी शुक्रवारी सकाळी रोडवरील माफीवीर सावरकर ही अक्षरे मिटवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत शहरात ही बातमी पसरली होती.

 

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी या कृत्याचा निषेध केला आहे. ज्याने कोणी हे कृत्य केले असले त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील असे ते सांजवार्ता ऑनलाईनशी बोलताना म्हणाले. तणवाणी म्हणाले, की या प्रकरणाची पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली जाणार असून याचा तत्काळ तपास करण्याची मागणी भाजपतर्फे केली जाणार आहे.

  

तत्पूर्वी या घटनेची माहिती मिळताच विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक शेषरावउदार, गोरख चव्हाण, मच्छिंद्र जाधव, गोकुळ लोदवाल यांनी जाऊन काळ्या रंगाने ते नाव पुसून टाकले  आहे.